Ticker

6/recent/ticker-posts

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी संसदेत ठिय्या; डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली खासदार चंद्रशेखर आजाद यांचे धरणे,ओवैसींची भेट



नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजाद समाज पक्षाचे अध्यक्ष व नगीना मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर आजाद यांनी संसद भवन परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली धरणे आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी रात्री उशिरापासून ते तेथे ठिय्या देऊन बसले असून,विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

आज संसद परिसरात AIMIM अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी चंद्रशेखर आजाद यांची भेट घेऊन आंदोलनाची माहिती घेतली. या भेटीनंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने संवाद साधावा,अशी मागणी अधिक जोराने पुढे येत आहे.

चंद्रशेखर आजाद यांनी म्हटले आहे की,जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईमुळे ते व्यथित झाले आहेत. लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून, विद्यार्थ्यांच्या आवाजाचे दमन स्वीकारले जाणार नाही. सरकारने विद्यार्थ्यांशी तात्काळ चर्चा करून त्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण कराव्यात,अशी त्यांची भूमिका आहे. 

जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमितता,पेपरफुटी प्रकरणांवर कठोर कारवाई,शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनाला विविध विद्यार्थी संघटना तसेच काही सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. 

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना संसद परिसरात खासदार चंद्रशेखर आजाद यांनी केलेल्या या धरण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. आता सरकार या आंदोलनावर कोणती भूमिका घेते,याकडे देशभरातील विद्यार्थी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.