Ticker

6/recent/ticker-posts

अवैध सावकारी प्रकरणात एम.बी.गायकवाड निर्दोष; न्यायालयाने फेटाळले सर्व आरोप


सोलापूर : बेकायदेशीर व विनापरवाना सावकारी केल्याचा आरोप असलेल्या सोलापूर येथील व्यावसायिक एम. बी. गायकवाड (रा.न्यू पाच्छा पेठ,सोलापूर) यांची न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी पक्ष आरोपीविरुद्धचा गुन्हा संशयातीतपणे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवत सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (न्यायालय क्र.१०) यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

ऑगस्ट २०१६ मध्ये सहनिबंधक कार्यालयाच्या पथकाने आणि जेलरोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी एम. बी. गायकवाड यांच्या निवासस्थानी धाड टाकून काही कोरे बॉण्ड, धनादेश आणि वह्या जप्त केल्याचा दावा केला होता. त्यानंतर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२४/२०१६ दाखल करण्यात आला होता. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ च्या कलम ३९ अंतर्गत गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते.


या प्रकरणाची सुनावणी नियमितपणे पार पडली. बचाव पक्षाचे वकील ॲड. श्रीनिवास कटकूर यांनी केलेल्या युक्तिवादासह साक्षीदारांच्या उलटतपासणीत अनेक गंभीर विसंगती समोर आल्या. सरकारी पक्षाचे फिर्यादी,पंच आणि तपासी अधिकाऱ्यांच्या जबाबांमध्ये तसेच धाडीच्या तारखांमध्ये परस्परविरोधी माहिती आढळल्याचे न्यायालयाने नमूद केले.

तसेच ज्या घरावर धाड टाकण्यात आली ते घर आरोपीच्या मालकीचे असल्याचे सिद्ध करणारी कोणतीही कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करण्यात आली नव्हती. घरझडतीचे अधिकृत आदेशही अभिलेखावर आणण्यात आले नसल्याची नोंद न्यायालयाने घेतली.





याशिवाय जप्त करण्यात आलेले धनादेश आणि बॉण्ड्स अवैध सावकारीसाठी वापरले जात होते, हे सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नाही. मूळ तक्रारदाराच्या नावाचा कोणताही धनादेश किंवा बॉण्ड आरोपीकडे आढळून आला नसल्याने सरकारी पक्षाचा दावा कमकुवत ठरल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.


या सर्व बाबींचा विचार करून सरकारी पक्ष आरोपीविरुद्धचा गुन्हा संशयातीतपणे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद करत न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २४८(१) अन्वये एम. बी. गायकवाड यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.

या खटल्यात आरोपी एम.बी.गायकवाड यांच्यातर्फे ॲड. श्रीनिवास कटकूर आणि ॲड. आकांक्षा आयंची यांनी बाजू मांडली.