सोलापूर : सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सोलापूर-मुंबई 'स्टार एअर'ची विमानसेवा 2 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होत आहे. ही सेवा आठवड्यातून चार दिवस म्हणजे रविवार,सोमवार,बुधवार आणि शुक्रवार या दिवशी उपलब्ध राहणार आहे. तसेच आजपासून या विमानसेवेच्या तिकीट विक्रीलाही सुरुवात झाली आहे.
या विमानसेवेच्या पुनरारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांना यश आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच विकास मंचने या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करून विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान,सोलापूरहून गोवा आणि हैदराबाद या शहरांसाठीही विमानसेवा सुरू करण्यासाठी विकास मंचकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली. सोलापूर-मुंबई विमानसेवेचे तिकीट दर ₹4,510 ते ₹5,999 दरम्यान असणार आहेत.
या विमानसेवेच्या पुनरारंभामुळे सोलापूरकरांना मुंबईसह देशातील विविध शहरांशी हवाई संपर्क अधिक सुलभ होणार असून,उद्योग,व्यापार,शिक्षण आणि वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
