Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; ४९८-अ प्रकरणात शेट कुटुंबातील पाचही आरोपी निर्दोष


सोलापूर : सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (न्यायालय क्र. ६) जे. पी. पाटील यांनी १३ जुलै २०२६ रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात ४९८-अ (हुंडाबळी व वैवाहिक छळ) प्रकरणातील पतीसह गुजरातच्या शेट कुटुंबातील पाचही आरोपींची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली आहे.

या प्रकरणात फिर्यादी सोनाली सत्यमकुमार शेट यांनी पती सत्यम महेंद्रकुमार शेट,सासरे महेंद्रकुमार शेट,सासू ज्योतीबेन शेट,दीर हिरेन शेट आणि जाऊ मोनलबेन शेट यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपींवर हुंड्याची मागणी,शारीरिक व मानसिक छळ तसेच दमदाटी केल्याचे आरोप करण्यात आले होते.





खटल्यादरम्यान बचाव पक्षाचे विधिज्ञ ॲड.श्रीनिवास कटकूर यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद करत अभियोजन पक्षाकडे आरोपींविरुद्ध कोणताही ठोस व विश्वासार्ह पुरावा नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच फिर्यादीने केवळ तक्रारीवरील सही मान्य केली असून तक्रारीतील मजकुराबाबत माहिती नसल्याचे न्यायालयात सांगितल्याकडेही लक्ष वेधण्यात आले.





दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर पुरावे विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने अभियोजन पक्ष आरोपींविरुद्धचा गुन्हा वाजवी शंकेच्या पलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद केले. त्यानुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २४८(१) (नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम २७१(१)) अन्वये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

या निकालामुळे सत्यम महेंद्रकुमार शेट,महेंद्रकुमार अमृतलाल शेट,ज्योतीबेन महेंद्रकुमार शेट,हिरेन महेंद्रकुमार शेट आणि मोनलबेन हिरेश शेट (रा.वर्धमान कॉलनी, वाढवण,जि.सुरेंद्रनगर,गुजरात) यांना दिलासा मिळाला आहे.

बचाव पक्षाचे विधिज्ञ ॲड.श्रीनिवास कटकूर, ॲड.आकाश आयंची,ॲड.रत्ना अंञोळीकर यांनी काम पाहिले आहे.