सोलापूर : सोलापूर शहरात परवानगीशिवाय सुरू असलेल्या रॅपिडो (Rapido) बाईक टॅक्सी सेवेविरोधात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कठोर भूमिका घेतली आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांवर तसेच संबंधित ॲपच्या माध्यमातून सेवा देणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
आरटीओने सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की,रॅपिडो ॲपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनांवर विशेष तपासणी मोहीम सुरू असून,आतापर्यंत ११ वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून चलन जारी करण्यात आले आहे.
तसेच,महाराष्ट्र शासन व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची आवश्यक परवानगी न घेता बाईक टॅक्सी सेवा सुरू ठेवल्याप्रकरणी १० जुलै २०२६ रोजी विजापूर नाका पोलिस ठाण्यात रॅपिडो कंपनीच्या तीन संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही पत्रात देण्यात आली आहे.
आरटीओने आपल्या पथकांना रॅपिडो ॲपद्वारे प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनांची नियमित तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले असून,अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी तत्काळ अशा सेवा बंद कराव्यात,अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,असा इशाराही देण्यात आला आहे.
