उत्तर सोलापुरातील मंडळ अधिकाऱ्यावर एसीबीची कारवाई; १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील तिळे येथील मंडळ अधिकारी विजयकुमार माने यांनी एका तक्रारदाराकडून १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार हा शेतीसोबत मुरूम वाहतुकीचा व्यवसाय करतो. बेलाटी येथील शेतातील विहीर खोदकामातून निघालेल्या मुरुमाच्या वाहतुकीस व वापरास परवानगी मिळण्यासाठी त्यांनी तहसीलदार, उत्तर सोलापूर यांच्याकडे अर्ज केला होता. त्यानुसार मंडळ अधिकारी विजयकुमार माने यांना स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
यावेळी सकारात्मक अहवाल देण्यासाठी मंडळ अधिकारी माने यांनी १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. त्यानंतर सरकारी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याने सलगरवस्ती पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत पोलीस उपअधीक्षक प्रशांत चोगुले, पोलीस निरीक्षक रविंद्र लंगमटे (एसीबी, सोलापूर) यांनी सापळा कारवाईचे नेतृत्व केले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील (एसीबी, सातारा) करीत आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर युनिट,पुणे परिक्षेत्र यांनी केली आहे.
