सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR - Special Intensive Revision) आणि बीएलओ (BLO - Booth Level Officer) ड्युटीच्या मुद्द्यावरून आयोजित बैठकीत मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी शाळाबाह्य कामांचा वाढता बोजा, विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान आणि शिक्षकांवर वाढणारा मानसिक ताण याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
बैठकीदरम्यान शिक्षकांनी SIR मोहिमेसाठी शिक्षकांना सातत्याने नियुक्त केल्यामुळे नियमित अध्यापनावर परिणाम होत असल्याचा आरोप केला. "शिक्षकांचे मुख्य काम विद्यार्थ्यांना शिक्षण देणे आहे. मात्र निवडणूक व इतर अशैक्षणिक कामांमध्ये वारंवार गुंतविल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे," असे शिक्षक प्रतिनिधींनी स्पष्टपणे मांडले.
या चर्चेदरम्यान वातावरण चांगलेच तापले असून प्रांताधिकारी संतप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. काही काळ बैठक तणावपूर्ण वातावरणात सुरू राहिली. शिक्षकांनी प्रशासनाकडून त्यांच्या अडचणी समजून घेण्याची मागणी केली, तर प्रशासनाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार SIR मोहिमेचे काम वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याची भूमिका मांडल्याचे सांगितले जाते.
राज्यात SIR आणि BLO ड्युटीच्या विरोधात शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून,शाळाबाह्य कामांमुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याची तक्रार सातत्याने केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील ही बैठकही वादळी ठरली. राज्यभर शिक्षक संघटनांनी BLO ड्युटीतून सूट देण्याची मागणी केली असून या विषयावर आंदोलनही छेडले आहे.
बैठकीत नेमके काय घडले,प्रांताधिकाऱ्यांनी कोणती भूमिका मांडली किंवा अधिकृत निवेदन काय आहे,याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतर पुढील तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
