Ticker

6/recent/ticker-posts

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर धामणगावात शांतता बैठक; अवैध धंद्यांवर करडी नजर,सुरळीत यात्रेसाठी पोलीस - ग्रामस्थांचा समन्वय



सोलापूर : आषाढी एकादशी निमित्त बार्शी तालुक्यातील धामणगाव येथे भरणाऱ्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वैराग पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस वैराग पोलीस स्टेशनचे फौजदार अमुल कादबाने उपस्थित होते.

धामणगाव येथील यात्रोत्सवात दरवर्षी लाखो भाविक सहभागी होत असल्याने यात्रा शांततेत,सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वाहतूक व्यवस्थापन,दर्शन रांगा,आरोग्यविषयक खबरदारी,स्वच्छता,डिजिटल मुक्त यात्रा,तसेच अवैध धंद्यांवर बंदी या मुद्द्यांवर ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यात आला.





यावेळी फौजदार अमुल कादबाने यांनी यात्रेदरम्यान अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाची करडी नजर राहणार असून कोणालाही कायदा व सुव्यवस्था बिघडवू दिली जाणार नसल्याचा इशारा दिला.

बैठकीत सुहास ढेकणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले,तर पोलीस पाटील गणेश मसाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी वैराग पोलीस स्टेशनचे कर्मचारी किसन कोलते, अभिजीत गाटे,संदेश पवार,संत माणकोजी बोधले महाराज मंदिरातील मानकरी,भाविक,गावातील होतकरू तरुण तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.