Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर उड्डाणपुलापूर्वी फेर वाहतूक सर्वेक्षण करा; चुकीच्या नियोजनामुळे हजारो कोटींचा चुराडा होऊ शकतो - केतन शहा


सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापूर शहरातील प्रस्तावित 9.66 किलोमीटर उड्डाणपुलाच्या प्रकल्पावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी गव्हर्निंग कौन्सिल सदस्य केतन शहा यांनी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यापूर्वी नव्याने वाहतूक सर्वेक्षण (Traffic Survey) करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

शहा यांनी सांगितले की,सन 2015-16 मध्ये तयार करण्यात आलेले उड्डाणपुलाचे नियोजन त्या वेळच्या वाहतुकीच्या परिस्थितीनुसार होते. त्यावेळी जड वाहतूक शहरातून जात होती आणि बाह्यवळण रस्ते उपलब्ध नव्हते. मात्र, आज विविध बाह्यवळण रस्ते सुरू झाल्यामुळे बहुतांश जड वाहतूक शहरात न येता बाहेरूनच जाते. त्यामुळे 11 वर्षांपूर्वीचा आराखडा आजही तितकाच उपयुक्त आहे का, याचा फेरविचार होणे आवश्यक आहे.

त्यांच्या मते,शहरातील नागरिक टोल भरून उड्डाणपुलाचा वापर करतील का,हा मोठा प्रश्न आहे. प्रस्तावित आराखड्यात केवळ चार ठिकाणीच उतरण्याची (एक्झिट) व्यवस्था असल्याने विजापूर रोड आणि होटगी रोडसारख्या महत्त्वाच्या भागांतील नागरिकांना त्याचा अपेक्षित लाभ मिळणार नाही.





केतन शहा यांनी जागा अधिग्रहण प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केला. आतापर्यंत सुमारे 96 कोटी रुपये खर्च झाले असून आणखी निधीची मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या ताब्यातील जागा आधी संपादित करून त्यानंतर खासगी जागा घेण्याची प्रक्रिया राबविणे अधिक योग्य ठरले असते,असे त्यांनी नमूद केले.





त्यांनी पुढे म्हटले की,शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एका लांब उड्डाणपुलाऐवजी ज्या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होते,अशा किमान 10 ते 12 ठिकाणी उड्डाणपूल, अंडरपास किंवा रस्ते रुंदीकरणाची कामे करण्यात यावीत. त्यामुळे शहरांतर्गत वाहतूक अधिक प्रभावीपणे सुरळीत होईल.

प्रस्तावित उड्डाणपुलाच्या खांबांमुळे खालील रस्ते अरुंद होतील आणि नागरिकांनी टोलमुळे पुलाचा वापर टाळल्यास खालच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच व्यापारी,दुकानदार आणि व्यावसायिकांवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो,असा इशाराही त्यांनी दिला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी 90 टक्के जागेचा ताबा मिळाल्यानंतरच पुढील टेंडर प्रक्रिया सुरू होईल,असे सांगितल्याचा दावा शहा यांनी केला.

"सोलापूर शहराचा विकास व्हायलाच हवा; मात्र तो योग्य नियोजनासह व्हावा. फेर वाहतूक सर्वेक्षण करूनच अंतिम निर्णय घ्यावा,अन्यथा हजारो कोटी रुपयांचा अपव्यय होण्याची शक्यता नाकारता येणार नाही," असे मत केतन शहा यांनी व्यक्त केले. तसेच या विषयावर सोलापूरकरांनीही गांभीर्याने अभ्यास करून आपली मते सार्वजनिकरित्या मांडावीत,असे आवाहन त्यांनी केले.