सोलापूर : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणूक २०२६ मध्ये सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवत हॅटट्रिक साधणारे सोलापूरचे सुपुत्र व ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. मिलिंद थोबडे यांचा सोलापूर जिल्हा न्यायालय परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात भव्य सत्कार करण्यात आला.
हा सत्कार सोहळा सोलापूर बार असोसिएशनचे माजी सचिव तथा जिल्हा न्यायालयातील ज्येष्ठ वकील अॅड.श्रीनिवास कटकूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी कायदे क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहून अॅड. थोबडे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष
अॅड. बसवराज सलगर,अॅडआकाश आयंची,अॅड.सूरज दुधगुंडी यांच्यासह अनेक वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. अॅड.श्रीनिवास कटकूर यांच्या हस्ते अॅड.मिलिंद थोबडे यांना शाल,पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी अॅड.थोबडे यांच्या कार्याचा गौरव करताना,सलग तीन वेळा बार कौन्सिलवर निवडून येणे ही त्यांच्या वकिलांच्या न्याय्य हक्कांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण संघर्षाची, प्रामाणिक कार्याची आणि प्रभावी नेतृत्वाची पावती असल्याचे मत व्यक्त केले. अॅड.श्रीनिवास कटकूर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,अॅड.मिलिंद थोबडे यांनी वकिलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत विश्वासार्ह नेतृत्व सिद्ध केले आहे.
त्यामुळेच राज्यभरातील वकिलांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करत ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. या विजयामुळे सोलापूर जिल्हा न्यायालय परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,राज्यभरातून अॅड.मिलिंद थोबडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
