Ticker

6/recent/ticker-posts

अल्पसंख्यांक भागातील विकासासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन; भाजपा आमदार देशमुख यांनी घेतली फारुख शाब्दी यांची भेट


कब्रस्तानासाठी निधीसह विविध विकासकामांची मागणी; आंदोलनस्थळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

सोलापूर : अल्पसंख्यांक बहुल भागातील विविध विकासकामे तसेच कब्रस्तानासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मुस्लिम नेते फारुख शाब्दी यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांनी भेट घेऊन पाहणी केली.

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्यांक बहुल भागांमध्ये रस्ते,पाणी,स्वच्छता,पथदिवे तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांचा विकास करण्यासोबतच कब्रस्तानासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा,या प्रमुख मागण्यांसाठी फारुख शाब्दी यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देत फारुख शाब्दी यांच्याशी चर्चा केली. यावेळी आंदोलकांच्या मागण्या,अल्पसंख्यांक भागातील विकासकामे आणि कब्रस्तानासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी भाजपाचे नगरसेवक तथा माजी सभागृह नेते शिवानंद पाटील,भाजपा अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जाकीर सगरी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित विकासकामांना गती द्यावी,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. अल्पसंख्यांक बहुल भागातील मूलभूत सुविधांचा प्रश्न आणि कब्रस्तानासाठी निधीचा मुद्दा मार्गी लागणार का,याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.





प्रमुख मागण्या - अल्पसंख्यांक बहुल भागात आवश्यक विकासकामे करावीत. रस्ते,पाणी,स्वच्छता व इतर मूलभूत सुविधांचा विकास करावा. कब्रस्तानासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. प्रलंबित विकासकामांना तातडीने मंजुरी देऊन कामांना सुरुवात करावी.

आंदोलनस्थळी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या भेटीमुळे या मागण्यांवर प्रशासनाकडून पुढील काळात कोणती भूमिका घेतली जाते,याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.