डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पुष्पहार अर्पण करून अभिवादन; ‘जय भीम,जय भारत,जय संविधान’च्या घोषणांनी परिसर दणाणला
सोलापूर : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘जय भीम, जय भारत, जय संविधान’ अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला. संविधानिक मूल्ये, सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांचा जागर करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला शेखर बंगाळे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत संविधानाचे संरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या या आनंदोत्सवामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काही काळ उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी घोषणाबाजी करत आपला आनंद व्यक्त केला.
कार्यकर्त्यांचा संदेश - “संविधान, समता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक विचारांच्या मार्गावर समाजाने पुढे जाणे गरजेचे आहे,” असा संदेश यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला.
