Ticker

6/recent/ticker-posts

बसवकल्याण क्षेत्र समितीची राज्यस्तरीय बैठक २ ऑगस्टला सोलापुरात


बसव भारत उत्सव २०२७,अनुभव मंटप,भाविकांच्या सुविधा व १ लाख ९६ हजार शरण-शरणींच्या इष्टलिंग पूजेच्या नियोजनावर होणार चर्चा

सोलापूर : बसवकल्याण क्षेत्र समिती,महाराष्ट्र राज्य यांची बैठक क्रमांक ४ रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सोलापुरात आयोजित करण्यात आली आहे. मातोश्री सिद्धव्वाबाई हत्तुरे मंगल कार्यालय,हत्तुरे नगर,सोलापूर विमानतळासमोर,होटगी रोड,मजरेवाडी येथे सकाळी १० वाजता ही बैठक होणार आहे. समितीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी ही माहिती दिली.

महात्मा बसवेश्वर यांची कर्मभूमी असलेल्या कर्नाटकातील बसवकल्याण, जिल्हा बिदर येथे झालेल्या केंद्रीय समितीच्या बैठकीत सोलापुरात पुढील बैठक घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला होता. केंद्रीय समितीचे मुख्य संयोजक तथा माजी खासदार बसवराज पाटील सेडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक डॉ.गंगांबिका अक्का,महाराष्ट्राचे प्रभारी माजी अधिष्ठाता डॉ.अमरनाथ सोलपुरे,निवृत्त न्यायाधीश सुभाषचंद्र नागराळे,ज्येष्ठ साहित्यिक सोमनाथ याळवार,डॉ.महेश पाटील,प्रा.सुनील हेंगणे,विजयकुमार हत्तुरे,डॉ.देविका नागरे,कावेरी पाटील आदी उपस्थित होते.

बसवकल्याणच्या विकास व नियोजनावर सविस्तर चर्चा
सोलापुरात होणाऱ्या बैठकीत बसवकल्याण नगरीला भेट देणाऱ्या पर्यटक व भाविकांसाठी मार्गदर्शन, दासोह व निवास व्यवस्था, तसेच नूतन अनुभव मंटपाची संरचनात्मक माहिती यावर चर्चा होणार आहे. यासोबतच बसव भारत उत्सव २०२७च्या नियोजनाबाबतही सविस्तर विचारविनिमय करण्यात येणार आहे.

याशिवाय बसवकल्याण क्षेत्र समितीच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन आगामी कार्यक्रमांची दिशा निश्चित केली जाणार आहे. १ लाख ९६ हजार शरण-शरणींच्या इष्टलिंग पूजेचे नियोजन बैठकीतील महत्त्वाचा विषय म्हणजे १ लाख ९६ हजार शरण-शरणींच्या इष्टलिंग पूजेचे नियोजन. भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची माहिती,सांस्कृतिक कार्यक्रम,विविध स्पर्धा आणि त्यांचे नियोजन याबाबत आराखडा तयार केला जाणार आहे.

तसेच २३ ते २७ डिसेंबर २०२७ दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे वेळापत्रक आणि नियोजन यावरही बैठकीत चर्चा होणार आहे.

स्नेहभोजनाचे आयोजन - बैठकीनंतर दुपारी १ ते २ या वेळेत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते,समाजबांधव आणि बसवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठक यशस्वी करावी,असे आवाहन बसवकल्याण क्षेत्र समितीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी केले आहे.

यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष बसवराज दिंडोरे,शहराध्यक्ष चन्नप्पा गुरुभेट्टी,सकलेश बाबुळगावकर,सिद्धाराम कटारे, नामदेव फुलारी,नागेश पडणूरे,श्रीशैल पॅडशिंगे,सिद्धाराम तांबुळे आदी उपस्थित होते.

बैठकीचे ठिकाण - मातोश्री सिद्धव्वाबाई हत्तुरे मंगल कार्यालय, हत्तुरे नगर,सोलापूर विमानतळासमोर,होटगी रोड, मजरेवाडी. रविवार, २ ऑगस्ट २०२६ सकाळी १० वाजता