Ticker

6/recent/ticker-posts

दोन वर्षांच्या चिमुकल्याला छतावरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न?


पत्नी व सासरच्या पाच जणांविरुद्ध सोलापूर न्यायालयात खाजगी फौजदारी तक्रार

सोलापूर : दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलाला छतावरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करत पत्नी व सासरच्या पाच जणांविरुद्ध सोलापूर न्यायालयात खाजगी फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. फिर्यादी विक्रम श्रीनिवास कामूर्ती यांनी ॲड.श्रीनिवास कटकुर यांच्या मार्फत सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे.पी. पाटील यांच्या न्यायालयात ही तक्रार दाखल केली आहे. ॲड.आकाश आयंची हेही या प्रकरणात काम पाहत आहेत.

विवाहानंतर वैवाहिक वाद - फिर्यादी विक्रम कामूर्ती व आरोपी क्रमांक १ नयना जगदीश माचेर्ला यांचा विवाह ४ मे २०२२ रोजी झाला. या वैवाहिक जीवनातून त्यांना अवनीश नावाचा मुलगा झाला. मात्र,वैवाहिक वाद निर्माण झाल्यानंतर पत्नी पाच महिन्यांची गर्भवती असताना घर सोडून गेल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

पत्नीने पुन्हा नांदण्यासाठी यावे यासाठी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रयत्न केले. तसेच सोलापूर कौटुंबिक न्यायालयात वैवाहिक सहजीवन पुनर्स्थापनेसाठी (Restitution of Conjugal Rights) खटलाही दाखल करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

चिमुकल्याला छतावरून ढकलल्याचा आरोप - फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, पत्नीला घटस्फोट न घेता दुसरे लग्न करायचे असल्याने दोन वर्षांचा मुलगा अवनीश हा कथितरीत्या अडसर ठरत होता. त्यातून आरोपींनी संगनमत करून मुलाला छतावरून खाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या घटनेत चिमुकल्या अवनीशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून,डोक्यात रक्ताच्या गाठी (Hematoma/Blood Clots) झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित वैद्यकीय उपचारांची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पाच जणांविरुद्ध कारवाईची मागणी तक्रारीत आरोपी म्हणून पुढील व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत : नयना जगदीश माचेर्ला ऊर्फ नयना विक्रम कामूर्ती – पत्नी
जगदिश अंबादास मार्चला – सासरे
लता जगदिश मार्चला – सासू
नितीन जगदिश मार्चला – मेव्हणा
अमृता जगदिश मार्चला – मेव्हणी
सर्व आरोपी सी-९/२, एमआयडीसी,अक्कलकोट रोड, सोलापूर येथील रहिवासी असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

BNS अंतर्गत कारवाईची मागणी - स्थानिक पोलिसांकडून अपेक्षित दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप करत फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली आहे. तक्रारीत भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील संबंधित कलमांनुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यामध्ये BNS कलम १०९ अंतर्गत खुनाचा प्रयत्न,कलम ६१(२) अंतर्गत गुन्हेगारी कट तसेच कलम ३(५) अन्वये समान हेतूने केलेल्या कृत्याबाबत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. धमकीसंदर्भात कलम ३५१ चा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे.

पाच लाख रुपये दंड व पोलिस संरक्षणाची मागणी
न्यायालयाने तक्रारीची दखल घेऊन संबंधित आरोपींविरुद्ध कायद्यानुसार प्रक्रिया सुरू करावी,समन्स अथवा आवश्यकतेनुसार वॉरंट जारी करावे आणि दोष सिद्ध झाल्यास कठोर शिक्षा करावी,अशी मागणी फिर्यादीकडून करण्यात आली आहे.

तसेच चिमुकल्या अवनीशच्या पुढील वैद्यकीय उपचारांसाठी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत/दंड देण्याची आणि त्याच्या सुरक्षेसाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान,या सर्व आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत तपासली जाणार असून,आरोप सिद्ध होईपर्यंत संबंधित आरोपींना दोषी ठरवता येणार नाही.