Ticker

6/recent/ticker-posts

सोलापुरातील ‘उर्दू घर’ असून अडचण...


मॅनेजर पद सात-आठ महिन्यांपासून रिक्त; लाखो रुपयांची पुस्तके कपाटातच

१८ जणांचे अर्ज येऊनही नियुक्ती रखडली; उर्दू भाषेच्या विकासासाठी उभारलेल्या केंद्राच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

सोलापूर : उर्दू भाषेचा सर्वांगीण विकास, प्रचार-प्रसार आणि उर्दू साहित्य व संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे,या उद्देशाने शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून सोलापुरात उर्दू घराची उभारणी करण्यात आली. सुमारे दोन वर्षांपूर्वी या उर्दू घराचे उद्घाटन झाले. मात्र,उर्दू भाषेच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या या केंद्राचेच व्यवस्थापन सध्या अडचणीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

उर्दू घराच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी एक मॅनेजर, एक क्लार्क आणि एक शिपाई अशी कंत्राटी तत्त्वावर पदे ठेवण्यात आली आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा खर्च शासनाकडून केला जातो. उर्दू घराच्या व्यवस्थापनावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील शासन नियुक्त समितीचे नियंत्रण आहे. या समितीत उर्दूचे प्राध्यापक, साहित्यिक,कलावंत आणि विचारवंतांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.



मुशायरा,कव्वाली,निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे नियोजन
उर्दू भाषेचा प्रचार-प्रसार वाढावा,नव्या पिढीमध्ये उर्दू भाषेविषयी आवड निर्माण व्हावी आणि उर्दू साहित्याला व्यासपीठ मिळावे,यासाठी उर्दू घराच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. यामध्ये उर्दू मुशायरा, कव्वाली,निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा तसेच साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.



उर्दू भाषेच्या अभ्यासकांसाठी आणि साहित्यप्रेमींसाठी येथे वाचनालयाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. नुकतेच या वाचनालयासाठी लाखो रुपयांची पुस्तके व ग्रंथ प्राप्त झाले आहेत. मात्र,ही पुस्तके वाचकांच्या उपयोगात येण्याऐवजी कपाटातच बंद असल्याची स्थिती असल्याची खंत उर्दूप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

मॅनेजर नसल्याने प्रशासनाचा भार क्लार्कवर
उर्दू घराचे मॅनेजर म्हणून मुख्याध्यापक राजा बागवान कार्यरत होते. मात्र,त्यांनी राजकारणात प्रवेश केल्याने मॅनेजर पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मागील सात-आठ महिन्यांपासून मॅनेजर पद रिक्त आहे.

दरम्यान, मॅनेजर पदासाठी संबंधित कार्यालयाकडून जाहिरात देऊन इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या पदासाठी एकूण १८ जणांनी अर्ज केल्याची माहिती आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊन दोन-तीन महिने उलटले असतानाही अद्याप मॅनेजरची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे “उर्दू घराचा मॅनेजर कधी नियुक्त होणार?” असा सवाल उर्दूप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

सध्या कंत्राटी क्लार्क नदाफ हेच प्रभारी म्हणून उर्दू घराचे प्रशासन आणि दैनंदिन कामकाज पाहत असल्याचे सांगण्यात येते. मॅनेजरचे पद रिक्त असल्याने नियोजित उपक्रम,वाचनालयाचा प्रभावी वापर आणि उर्दू भाषेच्या प्रचार-प्रसाराच्या कामावर त्याचा परिणाम होत असल्याची चर्चा आहे.



शासकीय अनुदानावरच उर्दू घराचा कारभार
सध्या उर्दू घराला शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाशिवाय अन्य कोणतेही ठोस उत्पन्नाचे साधन नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे उर्दू घराचे दैनंदिन व्यवस्थापन,कर्मचारी मानधन,कार्यक्रम आणि इतर उपक्रम हे प्रामुख्याने शासनाच्या अनुदानावर अवलंबून आहेत.

अशा परिस्थितीत मॅनेजरचे पद दीर्घकाळ रिक्त राहणे हा केवळ प्रशासकीय विषय नसून उर्दू भाषेच्या विकासासाठी उभारलेल्या केंद्राच्या उद्देशालाच बाधा पोहोचवणारा मुद्दा असल्याचे उर्दू भाषाप्रेमींचे म्हणणे आहे.

‘उर्दू घर’ केवळ इमारत न राहता उपक्रमांचे केंद्र व्हावे
उर्दू घरामध्ये लाखो रुपयांची पुस्तके उपलब्ध असूनही ती कपाटातच राहणार असतील, तर या केंद्राच्या स्थापनेचा उद्देश साध्य होणार कसा,असा प्रश्न उपस्थित होत आहे. उर्दू भाषेचे विद्यार्थी,साहित्यिक,कवी,लेखक,प्राध्यापक,कलावंत आणि वाचक यांना येथे नियमितपणे येण्यासाठी वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.

त्यासाठी रिक्त असलेल्या मॅनेजर पदाची तातडीने नियुक्ती करून उर्दू घराचे प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, तसेच वाचनालयातील पुस्तके वाचकांसाठी खुली करून नियमित साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत, अशी मागणी उर्दूप्रेमींकडून होत आहे.

शासनाने उर्दू भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी उभारलेल्या या केंद्राकडे गांभीर्याने लक्ष देऊन मॅनेजर नियुक्तीचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार का? याकडे आता सोलापूरच्या उर्दू भाषाप्रेमींचे लक्ष लागले आहे.