Ticker

6/recent/ticker-posts

प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू ; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यात सन २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू ; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : खरीप हंगाम २०२६-२७ साठी सोलापूर जिल्ह्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. अधिसूचित महसूल मंडळामध्ये अधिसूचित पिकाचे चालू वर्षातील सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाई मिळणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२६ ही अंतिम मुदत असून, शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तातडीने अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकरी हिस्सा (प्रति हेक्टर)
- बाजरी : विमा संरक्षित रक्कम ₹२७,००० – शेतकरी हिस्सा ₹१३५ 
- मुग व उडीद : विमा संरक्षित रक्कम ₹२७,००० – शेतकरी हिस्सा ₹५४० 
- तूर : विमा संरक्षित रक्कम ₹४२,००० – शेतकरी हिस्सा ₹४२० 
- मका : विमा संरक्षित रक्कम ₹४०,००० – शेतकरी हिस्सा ₹१०० 
- भुईमूग : विमा संरक्षित रक्कम ₹४२,००० – शेतकरी हिस्सा ₹८४० 
- सोयाबीन : विमा संरक्षित रक्कम ₹५८,००० – शेतकरी हिस्सा ₹१,१६० 
- कांदा : विमा संरक्षित रक्कम ₹७५,००० – शेतकरी हिस्सा ₹३,७५० 

अर्ज कसा कराल?
शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या नॅशनल क्रॉप इन्शुरन्स पोर्टल (NCIP) वर ऑनलाइन नोंदणी करता येईल. बँक,कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) किंवा स्वतः ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून योजनेत सहभागी होता येईल.





आवश्यक कागदपत्रे व अटी
१. ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी (Agristack Farmer ID) बंधनकारक. 
२. जमिनीची ७/१२, ८-अ, पीक लागवड घोषणापत्र. 
३. आधार क्रमांक व आधारशी संलग्न बँक खाते. 
४. डिजिटल क्रॉप सर्व्हे करणे बंधनकारक – डिजिटल क्रॉप सर्व्हेमधील पीक व विम्यासाठी नमूद केलेले पीक यामध्ये तफावत आढळल्यास डिजिटल क्रॉप सर्व्हेमधील नोंद अंतिम मानली जाईल व अर्ज रद्द होईल. 
५. योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान ०.१० हेक्टर क्षेत्र अधिसूचित पिकाखाली असणे आवश्यक.

गैरवापर केल्यास कारवाई - चुकीच्या माहितीच्या आधारे किंवा गैरमार्गाने अर्ज करून लाभ घेतल्याचे आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे कृषी विभागाच्या विविध योजनांपासून वंचित ठेवण्यात येईल.

संपर्क : योजनेसंदर्भात कोणतीही अडचण आल्यास संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा १४४४७ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

हवामान विभागाने यंदाच्या हंगामात व्यक्त केलेल्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आर्थिक संरक्षणासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्व पात्र शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२६ पूर्वी या योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.