Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूरच्या बी-२ मिळकतधारकांना दिलासा; आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला यश


सोलापूर : सोलापूर शहरातील वर्ग-२ (बी-२) सत्ताप्रकारच्या मिळकतधारकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मालकी हक्क व प्रशासकीय अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचे मानले जात आहे.

बैठकीत बी-२ मिळकतींशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी संबंधित प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. तसेच कायदेशीर,प्रशासकीय आणि धोरणात्मक बाबींवर सखोल चर्चा करून विविध विभागांमध्ये समन्वय साधत निर्णय प्रक्रियेला गती देण्यावर भर देण्यात आले.





या बैठकीस ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे तसेच महसूल, ग्रामविकास आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता,विभागीय समन्वय आणि धोरणात्मक निर्णयांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

शासन बी-२ सत्ताप्रकारच्या मिळकतधारकांच्या समस्या गंभीरपणे हाताळत असून,या प्रक्रियेमुळे सोलापूर शहरातील हजारो नागरिकांच्या मालमत्ताविषयक अडचणी दूर होण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आले.