सोलापूर : सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रविवारी रात्री उशिरा भाजपच्या केंद्रीय समितीने विविध विधान परिषद जागांसाठी उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली.
सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील संख्याबळ लक्षात घेता भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने पक्षाचा उमेदवार कोण असणार याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. उमेदवारीसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत आणि प्रशांत परिचारक यांच्यात चुरशीची स्पर्धा असल्याची चर्चा होती. मात्र अखेर पक्षश्रेष्ठींनी राजेंद्र राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
बार्शी नगरपालिका तसेच बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेल्या कामगिरीमुळे राजेंद्र राऊत यांची पक्षातील पकड अधिक मजबूत झाली होती. स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कार्य, व्यापक जनसंपर्क आणि नेतृत्व क्षमता यांचा विचार करून भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत ही महत्त्वाची संधी दिल्याचे मानले जात आहे.
उमेदवारी जाहीर होताच सोलापूर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विद्यमान संख्याबळाच्या आधारावर राजेंद्र राऊत यांच्या विजयाच्या शक्यता अधिक बळावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्री भगवंताचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतल्याची माहिती समोर आली असून,आगामी निवडणुकीसाठी त्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. भाजपच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे.
