पुणे, पिंपरी-चिंचवड : भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आणि एम.एम.जी.सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता सैनिक सफाई कामगार मेळावा कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या वतीने विकास कुचेकर यांनी उपस्थित राहून संविधान जनजागृतीचा संदेश दिला.
यावेळी विकास कुचेकर यांच्या लेखन व संकलनातून साकारलेल्या “संविधान बोलतेय... नागरिकांच्या संविधानाचा आवाज” या पुस्तकाची प्रत विधानसभा उपाध्यक्ष आण्णासाहेब बनसोडे यांना भेट देण्यात आली. संविधान मूल्यांच्या प्रसारासाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
कार्यक्रमात आपली भूमिका मांडताना विकास कुचेकर म्हणाले, “संविधान फक्त न्यायालयात जिवंत राहत नाही; ते नागरिकांच्या धोरणात,सचोटीमध्ये आणि जागृतीत जिवंत राहतं.” त्यांनी पुढे सांगितले की,जेव्हा नागरिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात तेव्हा संविधान बोलते, दुर्बलांच्या बाजूने उभे राहतात तेव्हा संविधान चालते, समानतेसाठी लढतात तेव्हा संविधान वाढते आणि भीतीचे बंधन तोडून सत्यासाठी उभे राहतात तेव्हा संविधान जिंकते.
लोकशाही केवळ सरकारमुळे टिकत नाही,तर जागरूक, सजग आणि जबाबदार नागरिकांमुळे टिकते,असेही त्यांनी नमूद केले.
प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्ये आपल्या कृतीत उतरवली तर सामाजिक परिवर्तनाची मोठी लाट निर्माण होऊ शकते. भारतीय संविधानाचा सन्मान राखणे, मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि सामाजिक न्यायासाठी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात स्वच्छता कामगारांच्या समस्या,हक्क आणि सामाजिक सन्मान याबाबतही चर्चा करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता सैनिकांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
विकास कुचेकर - अध्यक्ष, मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था लेखक : “संविधान बोलतेय... नागरिकांच्या संविधानाचा आवाज”
