Ticker

6/recent/ticker-posts

धावत्या एलटीटी–दिब्रुगड एक्सप्रेसमध्ये बाळाचा जन्म; मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने सुरक्षित प्रसूती



भुसावळ : मानवी संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा आणि तत्पर सेवेचे उत्कृष्ट उदाहरण दाखवत मध्य रेल्वेच्या रनिंग स्टाफने प्रवाशांच्या सहकार्याने धावत्या रेल्वेत एका महिलेची सुरक्षित प्रसूती घडवून आणली. गाडी क्रमांक १५९४५ लोकमान्य टिळक टर्मिनस–दिब्रुगड एक्सप्रेसमध्ये ३० मे रोजी भुसावळ आणि इटारसी दरम्यान ही घटना घडली असून महिलेने एका निरोगी मुलाला जन्म दिला.

मिळालेल्या माहितीनुसार,सायंकाळी सुमारे ५.२५ वाजता रवी चौधरी यांनी ट्रेनचे कंडक्टर एस.पी.फिरके आणि तिकीट तपासनीस अंबरीश कुमार तिवारी यांच्याकडे धाव घेत पत्नी ज्योती चौधरी यांना अचानक तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्याची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत रेल्वे कर्मचाऱ्यांनी कोणताही वेळ न दवडता तात्काळ मदतकार्य सुरू केले.



बी-६ डब्याच्या गॅलरीत ब्लँकेट आणि चादरींच्या साहाय्याने स्वच्छ व सुरक्षित जागा तयार करण्यात आली. तसेच गर्भवती महिलेला आरामदायी स्थितीत ठेवून आवश्यक ती काळजी घेण्यात आली. याचवेळी सायंकाळी ५.२८ वाजता भोपाळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून हरदा स्थानकावर डॉक्टर आणि रुग्णवाहिकेसह तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली.

नियंत्रण कक्षाकडून तत्काळ सकारात्मक प्रतिसाद मिळाला. दरम्यान, रेल्वे कर्मचारी आणि महिला प्रवाशांच्या मदतीने सायंकाळी सुमारे ५.४० वाजता धावत्या ट्रेनमध्येच ज्योती चौधरी यांनी एका निरोगी मुलाला जन्म दिला. नवजात बाळाच्या पहिल्या रडण्याने संपूर्ण डब्यात आनंदाचे आणि सुटकेचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे कौतुक केले.



यानंतर सायंकाळी ६.०७ वाजता ट्रेन हरदा स्थानकावर पोहोचली. तेथे रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), स्थानक कर्मचारी,महिला पोलीस कर्मचारी तसेच पॅरामेडिकल पथक वैद्यकीय मदतीसाठी सज्ज होते. प्रसूतीनंतर नाळ कापण्याची प्रक्रिया बाकी असल्याने आई आणि बाळाला पुढील उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,आई आणि नवजात बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असून ते सुरक्षित आणि निरोगी आहेत.

या संपूर्ण घटनेत मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता,संवेदनशीलता आणि मानवी दृष्टिकोन यामुळे आणखी एकदा भारतीय रेल्वे ही केवळ प्रवासाची सुविधा नसून संकटसमयी प्रवाशांसाठी आधारवड असल्याचे सिद्ध झाले आहे.