भटके विमुक्त आदिवासी कार्यकर्त्यांचे एकदिवसीय शिबिर; संघटन बांधणीसह न्याय हक्कांसाठी लढ्याचा निर्धार
सोलापूर : भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती, सोलापूर जिल्हा यांच्या वतीने जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील कार्यकर्त्यांचे एकदिवसीय क्षमता बांधणी शिबिर शनिवारी जिल्हा सार्वजनिक वाचनालय, सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शिबिरात संघटन मजबूत करण्याबरोबरच घरगणना-जनगणना, SIR प्रक्रिया, महसूल विभागाचे घर व जागा आदेश तसेच ‘कॉम्बिन ऑपरेशन’च्या नावाखाली पारधी व इतर भटके विमुक्त समाजावर होत असलेल्या पोलिस अत्याचारांच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
शिबिरात बार्शी,मोहोळ,माढा,अक्कलकोट,दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सामाजिक न्याय,मानवाधिकार, कायदे आणि संविधानिक हक्कांबाबत मार्गदर्शन करत संघटनात्मक ताकद वाढविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
मुंबई येथील समिती सदस्य मुमताज शेख यांनी घरगणना व जनगणना प्रक्रियेत भटके विमुक्त आदिवासी समाजाला सातत्याने डावलले जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत शासनाच्या धोरणांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी कार्यकर्त्यांना कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने संघर्ष उभारण्याचे आवाहन केले.
पुण्याचे आप्पाराव राठोड यांनी SIR प्रक्रिया तसेच महसूल विभागाच्या घर व जागा आदेशांबाबत सविस्तर कायदेशीर माहिती दिली. तर बार्शीचे ॲड.सुहास कांबळे यांनी ‘कॉम्बिन ऑपरेशन’च्या नावाखाली होणाऱ्या पोलिस कारवाईविरोधात नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी,याबाबत मार्गदर्शन केले.
मानवाधिकार कार्यकर्ते मनीष देशपांडे यांनी पोलिस अत्याचारांवरील अहवाल मंजूर करून घेण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
यावेळी ज्येष्ठ सदस्य यशवंत फडतरे यांनी जिल्ह्यातील संघटनात्मक कामाचा आढावा मांडला. ग्रामीण भागातील संघटन वाढ, जनजागृती मोहिमा आणि सामाजिक प्रश्नांवरील लढ्याचा अहवाल विजय शिंदे व बाबासाहेब शेळके यांनी सादर केला.
जनजागृती मोहिमेचा निर्धार - शिबिराच्या समारोपावेळी कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन जनगणना, SIR प्रक्रिया आणि पोलिस अत्याचारांविरोधात व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊन समाजाच्या प्रश्नांबाबत ठोस भूमिका घेण्याची मागणी करण्याचे ठरविण्यात आले.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी यशवंत फडतरे,मनीष देशपांडे,विजय शिंदे,वैशाली बनसोडे,रोहिणी गायकवाड, कीर्तीपाल शिवशरण,मार्था आसदे,योजना कामतकर,सुषमा कांबळे,छकुली शिंदे आणि बाळासाहेब शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट “जनगणनेतून वगळणे गंभीर; रस्त्यावर उतरून लढा उभारू” - मुमताज शेख
“भटके विमुक्त आदिवासी समाजाला घरगणना, जनगणना आणि SIR प्रक्रियेतून वगळले जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. हा केवळ प्रशासकीय दुर्लक्षाचा विषय नसून समाजाच्या अस्तित्वाशी निगडित प्रश्न आहे. याविरोधात न्यायालयीन, प्रशासकीय तसेच रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारला जाईल,” असा इशारा समिती सदस्य मुमताज शेख यांनी दिला.
