Ticker

6/recent/ticker-posts

धाडसी व पारदर्शक अधिकाऱ्याला बळीचा बकरा? जगन्नाथ बनसोडे प्रकरणाकडे सोलापूरकरांचे लक्ष


सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे हे पारदर्शक,धाडसी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात असल्याने त्यांना बळीचा बकरा बनवण्यात आल्याची चर्चा सध्या सोलापूर शहरात रंगत आहे. शहरातील अनेक नागरिकांकडून अशा प्रकारच्या भावना व्यक्त केल्या जात असून,बनसोडे यांच्यावरील कारवाईमागे पूर्ववैमनस्य आणि राजकीय दबाव असल्याचा आरोपही काही स्तरांतून केला जात आहे.



अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान कठोर भूमिका घेऊन अनेक प्रभावशाली घटकांवर कारवाई केल्यामुळे बनसोडे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच त्यांना पूर्ववैमनस्यातून चोरीच्या प्रकरणात गोवण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या प्रकरणात सत्य काय आहे,याचा निर्णय तपासानंतरच स्पष्ट होणार असला तरी बनसोडे यांच्याबाबत नागरिकांमध्ये सहानुभूतीची भावना दिसून येत आहे.



दरम्यान,सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी अशा निर्भीड व पारदर्शकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे,अशी अपेक्षा सोलापूरकर व्यक्त करत आहेत. प्रशासनाने वस्तुनिष्ठ चौकशी करून न्याय्य निर्णय घ्यावा,अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

या संपूर्ण प्रकरणात महापालिका आयुक्त कोणती भूमिका घेतात आणि पुढे काय निर्णय घेतला जातो,याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. शहरात सुरू असलेल्या चर्चांमुळे हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेचा विषय ठरले आहे.