Ticker

6/recent/ticker-posts

"३६ गुण नव्हे, कर्तृत्व महत्त्वाचे" : मराठा वधू-वर मेळाव्यात कालबाह्य परंपरांवर प्रहार


सोलापूर : विवाह जुळवताना पत्रिका, मंगळ दोष, ९६ कुळी आणि गुण-जुळवणी यांसारख्या बाबींना अवाजवी महत्त्व दिल्यामुळे अनेक योग्य विवाह प्रस्ताव केवळ पारंपरिक कारणांमुळे नाकारले जात असल्याची खंत व्यक्त करत, "३६ गुण जुळले तरी विवाह मोडतात; त्यामुळे पत्रिकेपेक्षा मुला-मुलींचे शिक्षण, स्वभाव, कर्तृत्व आणि भविष्याला प्राधान्य द्यावे," असा ठाम संदेश मान्यवरांनी दिला.

मराठा सेवा संघ संचलित मराठा वधू-वर कक्षाच्या वतीने आयोजित ३२वा विवाह परिचय मेळावा रविवारी (२४ मे) निर्मलकुमार फडकुले सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील होते.



यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर,नगरसेवक मनीष केत, विनोद भोसले,अनंत जाधव,मृण्मयी गवळी,कल्पना कदम, माजी नगरसेवक पद्माकर काळे,बाळासाहेब माने,माजी परिवहन सभापती राजन जाधव,बिल्डर असोसिएशनचे चेअरमन दत्ता मुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदनेने झाली. प्रास्ताविकात सदाशिव पवार यांनी मराठा सेवा संघाच्या वधू-वर मेळाव्यांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
नगरसेवक मनीष केत यांनी मुलांच्या पगारापेक्षा त्यांच्या कर्तृत्वाला अधिक महत्त्व देण्याची गरज व्यक्त केली. तर राजन जाधव यांनी विवाह सोहळ्यांतील अनावश्यक खर्च, प्री-वेडिंगसारख्या वाढत्या ट्रेंडवर टीका करत विवाह साधेपणाने करण्याचे आवाहन केले. नगरसेवक अनंत जाधव यांनीही मुलांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यावर भर दिला.
अध्यक्षीय भाषणात प्रशांत पाटील यांनी मराठा समाजात विवाह जुळवताना येणाऱ्या अडचणी, ९६ कुळी संदर्भातील गैरसमज,पत्रिका आणि मंगळ दोष यांसारख्या मुद्द्यांवर भाष्य केले. या पारंपरिक बाबींपेक्षा मुला-मुलींच्या कर्तृत्वाकडे आणि व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.



या मेळाव्यात सुमारे ४५० हून अधिक वधू-वर आणि पालकांनी सहभाग नोंदवला. शहर व जिल्ह्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिल्याने मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मेळावा यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, अंबादास सपकाळे,राम माने,अभिजंली जाधव,आर.पी. पाटील,प्रकाश ननवरे,लता डेरे,प्रीती कदम,राजू व्यवहारे,प्रा. जीवन यादव,रमेश जाधव,परशुराम पवार,प्रदीप कळंब, विश्वनाथ गायकवाड,मनोज मोरे,अविनाश गोडसे,दीपक शेळके,गोवर्धन गुंड,दत्ता जाधव,प्रकाश डोंगरे,नवनाथ कदम, नितीन मोहिते,सचिन चव्हाण,कल्याण गव्हाणे,राजू मिरकले आदींनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पवार यांनी केले,तर आभार प्रा.लक्ष्मण महाडिक यांनी मानले.