Ticker

6/recent/ticker-posts

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत सोलापूर शहर जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे उत्साहात उद्घाटन


सोलापूर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत सोलापूर शहर जिल्हा प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन चिंचोळी येथील प्रभाकर रिसॉर्ट येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. पक्ष संघटन अधिक सक्षम करण्यासह कार्यकर्त्यांना वैचारिक,संघटनात्मक आणि जनसंपर्काच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

भाजपा सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आयोजित या प्रशिक्षण वर्गात पक्षाची विचारधारा,संघटनात्मक बांधणी, प्रभावी जनसंपर्क,बूथ व्यवस्थापन,केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती तसेच समाजात अधिक प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यपद्धतींबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विविध विषयांवर वरिष्ठ नेते व अनुभवी मार्गदर्शकांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षाची भूमिका आणि आगामी काळातील आव्हाने यावरही विचार मांडले.



प्रशिक्षण वर्गादरम्यान वरिष्ठ नेत्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी नव्या उमेदीने काम करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुका आणि संघटनात्मक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर हा प्रशिक्षण वर्ग महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष रोहिणी तडवळकर,भाजपा सोलापूर शहर जिल्हा प्रभारी आमदार योगेश टिळेकर, सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे,आमदार गोपीचंद पडळकर,सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल,उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर,माजी खासदार अमर साबळे,योगेश बाचल, ॲड.अनिकेत निकम यांच्यासह भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि विविध आघाड्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासह जनतेशी संवाद वाढविण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर देण्यात आला. कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.