Ticker

6/recent/ticker-posts

अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेचा बुलडोझर; आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांची प्रत्यक्ष पाहणी


सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेकडून शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला अधिक गती देण्यात आली असून महानगरपालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या पाडकाम कारवाईची पाहणी केली.

महानगरपालिकेच्या वतीने 29 नवी पेठ येथील सुरतवाला यांच्या जागेवरील तसेच शुक्रवार पेठ येथील जवाहर मोतीलाल शहा यांच्या सी.एस.क्रमांक 3994/क-2 या ठिकाणावरील अनधिकृत बांधकामांवर पाडकामाची कारवाई करण्यात आली. आयुक्तांनी या दोन्ही ठिकाणी भेट देऊन कारवाईचा आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.



यावेळी बोलताना आयुक्त डॉ.ओम्बासे यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत महानगरपालिकेचे धोरण स्पष्ट करताना नियमबाह्य बांधकामांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले. अशा बांधकामांमुळे नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याने कोणत्याही प्रकारची अनधिकृतता खपवून घेतली जाणार नाही,असे त्यांनी स्पष्ट केले.

पाहणीदरम्यान निळकंठ मठपती आणि आनंद जोशी यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी सुरू असलेल्या कारवाईची माहिती आयुक्तांना दिली.

दरम्यान,शहरातील अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी बांधकाम करण्यापूर्वी महानगरपालिकेची आवश्यक परवानगी घेऊनच काम करावे,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.