त्रिवेंद्रम (केरळ) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी तथा केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांची त्रिवेंद्रम येथील केरळ विधानसभा कार्यालयात सोलापूर जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सृजन अभियानाच्या अंमलबजावणीदरम्यान झालेली अनागोंदी,नियोजनातील त्रुटी,कार्यकर्त्यांना आलेल्या अडचणी तसेच पदाधिकाऱ्यांवर झालेल्या अन्यायाबाबतचे सविस्तर निवेदन त्यांनी सादर केले.
भेटीदरम्यान हत्तुरे यांनी सृजन अभियानासंदर्भातील विविध संघटनात्मक मुद्द्यांवर लक्ष वेधत महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रतिनिधी मंडळाच्या भावना तसेच निवेदनातील विषयांचा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत विचार व्हावा,अशी मागणी करण्यात आली.
तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संविधानानुसार आणि विद्यमान परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा संघटनात्मक प्रश्नांबाबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी,प्रियंका गांधी वाडरा आणि पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी वेळ उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली.
याशिवाय विद्यमान जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या नैतिक,संघटनात्मक आणि लोकशाही विषयक प्रश्नांचा विचार करून ही प्रक्रिया स्थगित अथवा बरखास्त करावी, तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून स्वतंत्र व निष्पक्ष निरीक्षकांची नियुक्ती करावी,अशी मागणी करण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या संविधानातील अनुच्छेद २२, २३ आणि २४ नुसार पारदर्शक,लोकशाही व नैतिक अधिष्ठानावर आधारित जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया नव्याने राबविण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
सृजन अभियानासाठी सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक,ओडिशा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार देवाशिष पटनायक यांनी सादर केलेल्या अहवालाची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी रमेश चेन्निथला यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत योग्य स्तरावर या विषयाचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. तसेच या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून स्पष्टीकरण मागविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जनहित आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने मांडण्यात आलेले प्रश्न सकारात्मक पद्धतीने सोडविले जातील,असा विश्वासही चेन्निथला यांनी व्यक्त केला.
