Ticker

6/recent/ticker-posts

प्रभारी नगरअभियंता आकुलवार यांच्यावर आयुक्तांची कारवाई; सोलापूरकरांकडून डॉ.सचिन ओम्बासे यांचे कौतुक


मान्सूनपूर्व कामांतील दिरंगाईमुळे वार्षिक वेतनवाढ स्थगित; पारदर्शक चौकशीची नागरिकांची मागणी

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभारी नगरअभियंता सारिका गंगाराम आकुलवार यांच्यावर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केलेल्या कारवाईचे शहरभर स्वागत होत असून, सोलापूरकरांकडून आयुक्तांच्या धाडसी निर्णयाचे कौतुक करण्यात येत आहे. मान्सूनपूर्व नालेसफाई, खोलीकरण-रुंदीकरण आणि पूरनियंत्रण उपाययोजनांमध्ये झालेल्या दिरंगाईबाबत आकुलवार यांची एक वार्षिक वेतनवाढ स्थगित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

"महापालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत राहिलेल्या सारिका आकुलवार यांनी सहाय्यक अभियंता,पीएचई, गवसु तांत्रिक विभाग,भूमी मालमत्ता अधीक्षक, उपअभियंता,नगररचना विभाग तसेच प्रभारी नगरअभियंता अशी विविध पदे भूषविली आहेत. त्यांच्या कार्यकाळात काही निर्णय आणि कामकाजांबाबत शहरात अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे आयुक्तांनी केलेल्या कारवाईकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागले आहे."

गतवर्षीच्या पावसाळ्यात पनाश अपार्टमेंट आणि मंत्री चंडक परिसरात दीर्घकाळ पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर नालेसफाई, पाणी निचरा आणि पूरनियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी नगर अभियंता विभागाकडे सोपविण्यात आली होती. यासाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र संबंधित कामे वेळेत पूर्ण न झाल्याने निधी व्यपगत झाल्याचा ठपका आयुक्तांनी ठेवला आहे.



प्रशासनाकडून वेळोवेळी नाल्यांचे सर्वेक्षण,बेस मॅप तयार करणे,खोलीकरण-रुंदीकरण,गाळ काढणे तसेच पूरनियंत्रण आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. शिवाय वसुधरा कॉलेज,शरदचंद्र प्रशाला,संगमेश्वर कॉलेज परिसरातील नाल्यांच्या कामांबाबतही निर्देश देण्यात आले होते. मात्र आदेशांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याचे आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दि.२६ मे रोजी महापौर,सभागृह नेते आणि नगरसेवकांनी शिवदारे कॉलेज ते द्वारकाधीश मंदिर परिसरातील नाल्याच्या कामाची पाहणी केली असता काम सुरू नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली.

महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार, मान्सूनपूर्व कामांतील विलंबामुळे शहरात पाणी तुंबणे, घरांमध्ये पाणी शिरणे आणि नागरिकांना त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीस प्रभारी नगरअभियंता सारिका आकुलवार जबाबदार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.



नाल्यांसंदर्भात अनुचित घटना घडल्यास नगरअभियंता जबाबदार - महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ (१) (एक ते तीन) चा भंग झाल्याचे नमूद करत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ (२) (ब) नुसार सारिका आकुलवार यांची एक वार्षिक वेतनवाढ, पुढील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही अशा पद्धतीने हंगामी स्वरूपात स्थगित करण्यात आली आहे. तसेच भविष्यात नाल्यांसंदर्भात कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधित नगरअभियंता जबाबदार राहतील,असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

शहरातील नागरिकांनी या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली असून, महापालिका प्रशासनाने जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया पुढेही कायम ठेवावी,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.