Ticker

6/recent/ticker-posts

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची कुटुंबीयांना भेट, शिवसेनेकडून ५ लाखांची मदत


परळीत हृदयविकाराच्या झटक्याने भाजी विक्रेत्याचा मृत्यू; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची कुटुंबीयांना भेट, शिवसेनेकडून ५ लाखांची मदत

परळी : शिवसेनेचे संसदीय गटनेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ‘शिवसंवाद दौऱ्या’दरम्यान परळी येथे एक दुःखद घटना घडली. परळी येथील रसूल गफुर सय्यद उर्फ रसूल बाबा (वय ६५) हे निवेदन देण्यासाठी बैठकीच्या ठिकाणी आले असता त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

या घटनेची माहिती मिळताच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तत्काळ केज येथील रसूल बाबांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शोकाकुल परिवाराचे सांत्वन करत या कठीण प्रसंगी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,असा विश्वास दिला.



कुटुंबासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या एका कष्टकरी व्यक्तीचे अचानक निधन झाल्याने परिवारावर मोठे दुःख कोसळले आहे. या संकटाच्या काळात कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा या हेतूने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पक्षातर्फे तातडीने ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून ती कुटुंबीयांकडे सुपूर्द केली.

यावेळी उपस्थितांनी दिवंगत रसूल बाबांना श्रद्धांजली अर्पण केली. शिवसेना पक्षातर्फेही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना करण्यात आली.