सोलापूर : टी.पी. ३ फायनल प्लॉट क्रमांक ४४ येथील “संस्मरण उद्यान” आरक्षित जागेमध्ये सुरू असलेल्या “द इम्पिरियल पॅलेस” हॉलप्रकरणी पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तात्कालीन आयुक्त दीपक तावरे यांनी दि.०१ जुलै २०१९ रोजी संबंधित जागा तात्काळ ताब्यात घेण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र आदेशाला तब्बल अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही महानगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या निधीतून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा हॉल नियम बाय पद्धतीने शिवरत्न शिक्षण प्रसारक मंडळ यांना दि.२८/०७/२०१५ ते दि.२७/०६/२०१९ या कालावधीसाठी तीन वर्ष अकरा महिन्यांच्या कराराने देण्यात आला होता. संबंधित कराराची मुदत संपल्यानंतर जागा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीदेखील आजपर्यंत जागा ताब्यात घेण्यात आलेली नाही, यामागे काही अधिकाऱ्यांची भागीदारी असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते,सदर हॉल सध्या बेकायदेशीररित्या व्यावसायिक वापरासाठी सुरू असून एका दिवसात दोन-दोन तीन-तीन कार्यक्रम घेऊन प्रत्येकी ४० ते ८० हजार रुपये भाडे आकारले जात असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे अनेक वेळा भाड्याच्या अधिकृत पावत्या दिल्या जात नसल्याचाही आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या महसूल ला मोठा फटका बसत असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी शिवरत्न शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात आलेला दहा लाख रुपयांचा धनादेशही बाऊन्स झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणात प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कठोर कारवाई का करण्यात आलेली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान,संस्मरण उद्यान परिसरातील अनेक झाडांची बेकायदेशीर कत्तल झाल्याचाही आरोप करण्यात येत असून पर्यावरणप्रेमींनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. “हे उद्यान नेमके कोणाच्या समर्थनात चालवले जात आहे? मग त्याला ‘संस्मरण उद्यान’ कसे म्हणायचे?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांकडे दि.०१/०७/२०१९ च्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून संबंधित हॉल ताब्यात घेण्याची तसेच आदेशाची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
