Ticker

6/recent/ticker-posts

“लाडकी बहीण योजनेस स्व. अजित पवार यांचे नाव द्या”; वर्ल्ड ऑफ वुमन संस्थेची सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी


मुंबई : राज्यातील लोकप्रिय ठरलेल्या “लाडकी बहीण योजनेस” स्व.अजित पवार यांचे नाव देण्यात यावे,अशी मागणी “वर्ल्ड ऑफ वुमन” (WOW) संस्थेच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांच्या नेतृत्वाखालील महिला शिष्टमंडळाने लेखी निवेदन देत ही मागणी मांडली.
निवेदनात म्हटले आहे की,विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्व.अजित पवार यांनी जून २०२४ मध्ये “लाडकी बहीण योजना” जाहीर करून तिची प्रभावी अंमलबजावणी केली. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला असून, महिलांमध्ये या योजनेबद्दल मोठ्या प्रमाणात समाधानाची भावना आहे. त्यामुळे या योजनेस “स्व.अजित पवार लाडकी बहीण योजना” असे नाव देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,असे महिलांनी नमूद केले.



उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आले. यावेळी महिलांनी सांगितले की,ही योजना राज्यात पुन्हा सत्ता स्थापनेत “गेम चेंजर” ठरली. राज्यभरातील महिला अजितदादांना आशीर्वाद आणि दुवा देत आहेत. महिलांच्या भावना ऐकून सुनेत्रा पवार भावुक झाल्या. त्यांनी सांगितले की,ही मागणी रास्त असली तरी हा धोरणात्मक निर्णय असून मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळी “संजय गांधी निराधार योजना” अंतर्गत विधवा, घटस्फोटित आणि एकल महिलांना मिळणाऱ्या मानधनाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. सध्या या महिलांना दरमहा फक्त १५०० रुपये मिळतात आणि तेही वेळेवर मिळत नसल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम अत्यंत अपुरी असल्याने ती वाढवून दरमहा ३००० रुपये करण्यात यावी,अशी मागणीही संस्थेच्या वतीने करण्यात आली.

या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल,असे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिले.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांच्यासह मनीषा नलावडे,सायरा शेख,कांचन चौगुले,लक्ष्मी माने,शोभा गायकवाड,पुष्पा हलकुडे,स्वाती मुकणार,मारत असादे, शबाना शेख,शारदा मसूती,प्रिया कुलकर्णी,वंदना चंदनशिवे, सारिका लामतुरे आदी महिला उपस्थित होत्या.