Ticker

6/recent/ticker-posts

‘संस्मरण’ सील करण्याची मुदत संपली; महापालिका कारवाईचे धाडस दाखवणार का?


सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या चिल्ड्रन पार्कसाठी आरक्षित असलेल्या टी.पी. क्रमांक ३ मधील फायनल प्लॉट क्रमांक ४४ हा भूखंड एका संस्थेला नियमबाह्य पद्धतीने तब्बल ३ वर्षे ११ महिन्यांसाठी देण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. संबंधित संस्थेकडे आवश्यक लेखाजोखा नसतानाही काही अधिकाऱ्यांच्या संगनमतातून हा भूखंड “शिवरत्न शिक्षण प्रसारक मंडळ” संस्थेच्या घशात घालण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित करार करताना अनेक नियम धाब्यावर बसवण्यात आले. उद्यान परिसरातील मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करण्यात आली असून त्याचा कोणताही अधिकृत हिशेब उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच या परिसरात बांधकाम विभाग किंवा संबंधित महापालिका विभागाची परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे उभारण्यात आल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.



याशिवाय उद्यानाच्या चहुबाजूंनी मनमानी पद्धतीने रस्त्याकडे गेट उभारण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. “कोणाच्या आशीर्वादाने हे सर्व सुरू आहे?” असा सवाल आता सोलापूरकर उपस्थित करत आहेत.

कराराची मुदत संपल्यानंतरही महापालिकेने संबंधित जागा ताब्यात घेण्याची किंवा कारवाई करण्याची ठोस भूमिका घेतलेली दिसत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “संस्मरण” सील करण्याची मुदत संपली असताना महापालिका आता तरी धाडसाने कारवाई करणार का, याकडे संपूर्ण सोलापूरचे लक्ष लागले आहे.