Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर जि.प.माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्यावर ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी


सोलापूर : भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांच्यावर अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार,दिनांक ११ मे २०२६ रोजी आदिवासी पारधी समाजातील शितल बबूशा काळे या वेळापूर येथील इंग्लिश स्कूलमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत असून,सन २०२५ पासून प्रलंबित असलेल्या नियमित वेतनश्रेणी प्रस्तावाच्या पाठपुराव्यासाठी त्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात गेल्या होत्या. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागे कोणतेही संघटनात्मक किंवा राजकीय पाठबळ नसल्याचा गैरफायदा घेत अयोग्य वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.




तसेच प्रस्ताव मंजुरी व मान्यतेसाठी शरीरसुखाची मागणी करून मानसिक, लैंगिक व आर्थिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारास विरोध केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ पदाचा गैरवापर करून उलट शितल काळे यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे एका आदिवासी मागासवर्गीय महिलेची समाजात बदनामी झाली असून पारधी समाजामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान Narendra Modi आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis हे आदिवासी व पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असताना काही अधिकारी त्यांच्या प्रयत्नांना काळिमा फासत आहेत.

सदर अधिकारी यांच्यावर धाराशिव जिल्ह्यातही यापूर्वी अशाच स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये निलंबनाची कारवाई झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत,अशी मागणी करण्यात आली आहे.



यावेळी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ई-मेलद्वारे पाठवण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई होईपर्यंत राज्यभर धरणे, आंदोलन, मोर्चे व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण, शिक्षिका शितल बबूशा काळे, चिंटू पवार आदी उपस्थित होते.