पुणे : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बालेघर गावातील अनुसूचित जमाती नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी तसेच गावाच्या सामाजिक व ऐतिहासिक परिस्थितीच्या अभ्यासासाठी स्वतंत्र संशोधन सुरू करण्यात यावे,या मागणीसाठी आज पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन सुशांत मोरे तसेच कायदेविषयक सल्लागार ॲड. तृणाल टोणपे,ॲड.निकिता आनंदाचे आणि ॲड.सतीश मोघे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलनादरम्यान नागरिकांच्या वतीने संस्थेच्या आयुक्तांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात बालेघर गावामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असूनही नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रियेत गंभीर प्रशासकीय व तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. “अनुसूचित क्षेत्र” आणि “अनुसूचित जमात” या स्वतंत्र घटनात्मक संकल्पना असून,केवळ गाव अनुसूचित क्षेत्रात नसल्याच्या कारणावरून संशोधनास नकार देणे योग्य नसल्याचा मुद्दाही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
आंदोलनानंतर आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून विषयाची सकारात्मक दखल घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. संबंधित विषयाचा कायदेशीर व प्रशासकीय स्तरावर पुनर्विचार करण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.
सुशांत मोरे यांनी सांगितले की,राज्यघटनेनुसार सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या संरक्षणाची व उन्नतीची जबाबदारी शासनावर आहे. त्यामुळे शासन संस्थांनी केवळ तांत्रिक कारणांवर प्रश्न नाकारण्याऐवजी लोकाभिमुख आणि संवेदनशील भूमिका घेणे आवश्यक आहे. संबंधित मागण्यांबाबत समाधानकारक कार्यवाही न झाल्यास उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला.
ॲड. तृणाल टोणपे यांनी सांगितले की,भारतीय संविधानातील अनुच्छेद ३४२ नुसार अनुसूचित जमातीची ओळख राष्ट्रपती आदेशाद्वारे निश्चित केली जाते. त्यामुळे एखादे गाव “अनुसूचित क्षेत्र” मध्ये नसल्याच्या कारणावरून त्या गावातील अनुसूचित जमाती नागरिकांच्या सामाजिक,ऐतिहासिक व प्रशासकीय प्रश्नांचा अभ्यास करण्यास नकार देणे घटनात्मक दृष्ट्या योग्य ठरत नाही. बालेघर गावातील नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रियेत सातत्याने अडचणी येत असतील,तर त्या संदर्भात तथ्य संकलन,क्षेत्रीय अभ्यास आणि मार्गदर्शनपर सहाय्य करणे ही आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सुधाकर सुशलादी,आनंद घंटे तसेच बालेघर गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले असून पोलीस प्रशासनानेही सहकार्य केले.
