सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. १९ एप्रिल) सोलापूर शहरात काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसाठी सोलापूर पोलीस आयुक्तालयाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार,मिरवणूक सुरळीत व सुरक्षित पार पडावी यासाठी एकूण ३ पोलीस उपायुक्त, ७ सहाय्यक पोलीस आयुक्त, २४ पोलीस निरीक्षक, ६१ सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक,तसेच ९९५ पोलीस अंमलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ६०० होमगार्ड तसेच एसआरपीएफची १ कंपनीही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे.
शहरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नागरिक मिरवणुकीत सहभागी होणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
