सोलापूर : सोलापूर ते हैद्राबाद दरम्यानची विमानसेवा ‘फ्लाय ९१’च्या माध्यमातून शुक्रवारपासून उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरत सोलापूरकरांनी जल्लोषात या सेवेला स्वागत केले.
उद्घाटन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे राऊंड टेबल इंडिया, सोलापूर शाखेच्या वतीने सावळेश्वर येथील न्यू समता प्रशालेतील १० विद्यार्थ्यांना (७ मुली, ३ मुले) आणि एका शिक्षकाला त्यांच्या आयुष्यातील पहिल्या विमानप्रवासाचा अनुभव देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्सुकता उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.
यावेळी सोलापूर-हैद्राबाद प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे स्वागत मिठाई व नाश्त्याच्या हॅम्पर देऊन करण्यात आले. हा उपक्रम मिष्टी मिठाई (पार्क चौक) यांच्या सहकार्याने सोलापूर विकास मंचतर्फे राबवण्यात आले.
सोलापूर विकास मंचने शहरात नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश आले असून विविध शहरांशी हवाई संपर्क प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहराच्या विकासासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
फ्लाय ९१च्या वतीने प्रवाशांना बोर्डिंग पासचे वितरण व केक कापून विमानसेवेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सोलापूर विकास मंचचे केतन शहा,मनोज क्षीरसागर, योगीन गुर्जर,विजय कुंदन जाधव,तसेच मिष्टी मिठाईचे हेमल शहा उपस्थित होते. राऊंड टेबल इंडिया ३०९ सोलापूर शाखेचे तरंग शहा,अभिषेखा झंवर,नितेश सकलेचा,पुष्कराज कोठारी,रोहित राठी,पंकज सचदेव,अश्विन मुंदडा यांच्यासह फ्लाय ९१चे एअरपोर्ट मॅनेजर राजेश्वर रणसुभे व विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते.
दरम्यान,यापूर्वी या विमानसेवेबाबत विरोधकांनी शंका व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्ष सेवा सुरू झाल्याने त्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याची चर्चा शहरात रंगली.
नव्या विमानसेवेच्या प्रारंभामुळे सोलापूरहून हैद्राबादमार्गे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योगजगताशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे भविष्यात सोलापूरमध्ये उद्योग-व्यापार क्षेत्रात गुंतवणूक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
