Ticker

6/recent/ticker-posts

अतिक्रमणाविरोधात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; महापालिकेच्या कारवाईला मिळणार संरक्षण


सोलापूर : सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणाच्या विरोधात न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका घेतली असून सोलापूर महानगरपालिकेच्या कारवाईला मोठे न्यायालयीन पाठबळ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील अतिक्रमणविरोधी मोहिमेला नवे बळ मिळणार आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील 205-206, गोल्ड फिंच पेठ येथील सार्वजनिक रस्त्यावर ‘संगीतानंद पान शॉप’ नावाची पानटपरी उभारण्यात आली होती. ही टपरी हटवू नये,यासाठी टपरीधारक दशरथ मोरे यांनी दिवाणी न्यायालयात (दावा क्र.1396/2025) अर्ज दाखल केला होता. मात्र,सह दिवाणी न्यायाधीश संदीप नवले (कनिष्ठ स्तर) यांनी वादीचा तात्पुरत्या मनाईचा अर्ज फेटाळून लावला.

न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट निरीक्षण नोंदवले की, संबंधित पानटपरी ही सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण असून त्यामुळे परिसरात सार्वजनिक धूम्रपानाचे केंद्र निर्माण झाले होते. तसेच,महापालिकेने 12 फेब्रुवारी 2026 रोजी ही टपरी हटवून दंडात्मक कारवाई केली असल्याची नोंदही न्यायालयाने घेतली.

महत्त्वाचे म्हणजे, “महापालिकेने दंड वसूल केला म्हणून अतिक्रमणाला कोणताही कायदेशीर हक्क किंवा संरक्षण मिळू शकत नाही,” असे स्पष्ट करत न्यायालयाने अतिक्रमणाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.


या प्रकरणात संबंधित जागेजवळील वैद्य कुटुंबीयांनाही प्रतिवादी करण्यात आले होते. त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या निवेदनात सार्वजनिक धूम्रपान व पोलीस कारवाईबाबतची माहिती दिली होती. तसेच महापालिकेकडे करण्यात आलेल्या तक्रारींचीही दखल न्यायालयाने घेतली.
सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने 10 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार तात्पुरत्या मनाईचा अर्ज नामंजूर केला आहे.

या निर्णयामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या - अतिक्रमणविरोधी मोहिमेला न्यायालयीन संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील सार्वजनिक जागांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणात - वादीतर्फे ॲड.सचिन डी.पुजारी व ॲड. नबीसाब जमखंडी,महापालिकेतर्फे ॲड.एस.आर.पाटील,तर वैद्य कुटुंबीयांतर्फे ॲड.वैशाली सचिन गुप्ता यांनी बाजू मांडली.