सोलापूर : पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरातील महिला सुरक्षा विशेष कक्ष ‘भरोसा सेल’ आणि पंडित दिनदयाळ उपाध्याय डेंटल कॉलेज,केगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रमांतर्गत पथनाट्य सादर करण्यात आले.
शहरातील विविध भागांमध्ये-विडी घरकुल,तरटी नाका परिसर,सिद्देश्वर मंदिर,सातरस्ता आणि चार पुतळा-येथे हे पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. पथनाट्यातून महिलांना कौटुंबिक हिंसाचारास बळी न पडता तात्काळ ‘भरोसा सेल’ ची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच, ‘भरोसा सेल’ च्या माध्यमातून पती-पत्नी समुपदेशन करून कुटुंब पुन्हा एकत्र आणण्याचे काम केले जाते,याबाबतही माहिती देण्यात आले.
ही मोहीम पोलीस आयुक्त एम.राजकुमार,पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशा) डॉ.अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. कार्यक्रमाची अंमलबजावणी पोलीस निरीक्षक स्नेहा म्हेतर,महिला सुरक्षा विशेष कक्ष (भरोसा सेल) पथक तसेच पंडित दिनदयाळ उपाध्याय डेंटल कॉलेजच्या डॉ.अनुराधा मोकाशी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी केली.
