सोलापूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व खंडणी प्रकरणात अटक असलेल्या आरोपी फरदीन नासिर खान (वय २४,रा.गोल्डफिंच पेठ,उत्तर सोलापूर) याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती सचिन एस.देशमुख यांनी हा आदेश दिला.
या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशन,सोलापूर येथे १३ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हा क्रमांक ०६६५/२०२५ अंतर्गत ओम जोगळेकर, फरदीन नासिर खान आणि रितेश संतोष क्षीरसागर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमांसह पोक्सो कायद्यांतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार,सोशल मीडियाद्वारे ओळख वाढवून आरोपींनी तिच्याकडून फोटो मिळवले आणि त्यानंतर धमकी देत ब्लॅकमेल करून आर्थिक व शारीरिक शोषण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात फरदीन खान याला १४ सप्टेंबर २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. त्याचा जामीन अर्ज सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला.
आरोपीतर्फे सादर करण्यात आलेल्या युक्तिवादानुसार, तपास पूर्ण झाला असून आरोपी निर्दोष आहे, तो पुराव्यांवर परिणाम करणार नाही तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे पालन करेल, असा दावा करण्यात आला. तसेच आरोपीचा कोणताही गुन्हेगारी पूर्वइतिहास नसल्याचेही नमूद करण्यात आले.
सरकार पक्षाने जामिनास विरोध केला असला,तरी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. कदीर औटी,ॲड.सौरभ तांदळे,ॲड.वैभव बोंगे,ॲड.ओंकार फडतरे,ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड.मनिष बाबरे,ॲड.रोहित थोरात, ॲड.संकेत पवार यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षातर्फे ॲड.पी.पी.देवकर यांनी बाजू मांडली.
