Ticker

6/recent/ticker-posts

शाश्वत विकासासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घ्यावा - डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी


सोलापूर : शाश्वत विकास ध्येय (SDGs) प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापतींसाठी आयोजित एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार,विविध विषय समित्यांचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्यासह अधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


डॉ.कलशेट्टी यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचे नियोजन करताना ६० टक्के निधी पाणी व स्वच्छता यासाठी आणि उर्वरित ४० टक्के निधी इतर विकासकामांसाठी वापरण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “स्वच्छता दूत म्हणून काम करा, प्लास्टिक हटवा व पुनर्वापर वाढवा,” असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले.

यावेळी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी १५ वा व १६ वा वित्त आयोगातील बंधित व अबाधित निधीबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्याची मागणी केली. सभापती ॲड.अमृता वाघे यांनीही मनोगत व्यक्त केले.


माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील तरतुदींचे मार्गदर्शन केले. तसेच माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांनी “अधिकारी व कर्मचाऱ्यांशी समन्वय साधून विकासकामे गतीमान करा,अनावश्यक वाद टाळा,” असे सदस्यांना आवाहन केले.

पदाधिकाऱ्यांची साधेपणाची झलक दरम्यान,या प्रशिक्षणावेळी अध्यक्ष दीपक वैद्य,उपाध्यक्ष इंद्रजीत पवार व इतर सभापती यांनी सभागृहाच्या मागील बाकांवर बसून प्रशिक्षण घेतल्याने त्यांच्या साधेपणाची व नम्रतेची चर्चा रंगली.