सोलापूर : जिल्हा परिषदेत दीर्घकाळ एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कॉन्ट्रॅक्टबेस कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंग कारवाईचे संकेत मिळत असून, यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही कर्मचारी एकाच विभागात कार्यरत असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, कामचुकारपणा, वेळेवर हजेरी न लावणे, फाईली प्रलंबित ठेवणे आणि वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे अशा बाबींचा आढावा जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. विशेषतः कॉन्ट्रॅक्टबेसवर कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांविषयी गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.
दरम्यान, “एकाच ठिकाणी अनेक वर्षे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करावी, तसेच निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी,” अशी मागणीही जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर झेडपी सीईओ कुशल जैन कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रशासनाकडून लवकरच अंतर्गत चौकशी पूर्ण करून संबंधितांवर निलंबन, बदली किंवा करार रद्द करण्यासारख्या कारवायांचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत झेडपीतील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार का, याची उत्सुकता वाढली आहे.
