सोलापूर : सोलापूर शहरातील बाळे परिसरात होणारा बालविवाह पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळेत रोखण्यात आला. या कारवाईत अवघ्या १३ वर्षीय मुलीचे आयुष्य वाचवण्यात यश आले असून,दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करून विवाह थांबवण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार,अंबिका नगर,बाळे येथील गुरुकमल मंगल कार्यालय (खंडोबा मंदिराजवळ) शनिवार २५ एप्रिल रोजी बालविवाह होणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचल्यावर वधू-वर पक्षाकडील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे आढळून आले. साखरपुडा उरकून विवाहाची तयारी सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी वधूच्या कुटुंबीयांकडे कागदपत्रांची पडताळणी केली असता, संबंधित मुलीचे वय केवळ १३ वर्षे, ६ महिने आणि १२ दिवस असल्याचे स्पष्ट झाले.
अल्पवयीन मुलीचा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे सांगत पोलिसांनी उपस्थितांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची जाणीव करून दिली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करून विवाह सोहळा रद्द करण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी संबंधित मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम.राज कुमार,पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक स्नेहा म्हेतर,उपनिरीक्षक अश्विनी काळे,उपनिरीक्षक सुतार तसेच महिला सुरक्षा कक्षाच्या पथकाने संयुक्तरीत्या ही यशस्वी कारवाई केली.
