Ticker

6/recent/ticker-posts

‘आप’ला जबर धक्का : राघव चड्ढासह 3 राज्यसभा खासदारांचा भाजपात प्रवेश


नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली असून राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पार्टी (आप) चे आणखी दोन राज्यसभा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश केला आहे.


दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या भव्य कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या उपस्थितीत या तिन्ही खासदारांचा अधिकृत पक्षप्रवेश पार पडला. या प्रवेशामुळे राष्ट्रीय राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.



सूत्रांच्या माहितीनुसार, ‘आप’मधील अंतर्गत नाराजी, निर्णयप्रक्रियेत होत असलेले दुर्लक्ष आणि नेतृत्वावर वाढत असलेला अविश्वास यामुळे हे खासदार नाराज होते. गेल्या काही आठवड्यांपासून ते पक्ष नेतृत्वापासून दूर असल्याचेही दिसून येत होते. अखेर त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारत मोठा राजकीय निर्णय घेतला.

भाजपकडून या प्रवेशाचे जोरदार स्वागत करण्यात आले. “देशहित, विकास आणि स्थिर नेतृत्वासाठी त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे,” असे मत व्यक्त करत भाजपने याला आपवरील जनतेचा घटता विश्वास असेही म्हटले.
दुसरीकडे, ‘आप’ने या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “दबाव आणि प्रलोभनांच्या राजकारणामुळे ही फूट पडली,” असा दावा करत पक्षाने या नेत्यांवरही टीका केली आहे.



या घडामोडीमुळे राज्यसभेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार असून भाजपची ताकद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत निर्णायक मानली जात असून, पुढील काही दिवसांत आणखी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.