Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा बसवेश्वर आयटीआयत ‘बसवसृष्टी’ उभारण्याची मागणी - विजयकुमार हत्तुरे


सोलापूर : महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त विजापूर रोडवरील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सोलापूर आणि ड्रीम फाउंडेशन,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कायकवे कैलास’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना - माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी विजापूर रोड मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर महामंडळाच्या वतीने प्राचार्य मनोज बिडकर यांच्याकडे संस्थेच्या परिसरात सुमारे ५ एकर जागेत ‘बसवसृष्टी’ उभारण्याची मागणी केली. या प्रस्तावित प्रकल्पात भव्य अश्वारूढ पुतळा, कायक शरणांची माहिती केंद्र आणि विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सभागृह उभारण्याचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेकडे एकूण २८ एकर जागा असून येथे २७ विविध व्यवसाय प्रशिक्षण कोर्स चालवले जातात.



हत्तुरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,मंत्री मंगल प्रभात लोढा,पालकमंत्री जयकुमार गोरे आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे ईमेलद्वारेही ही मागणी पाठवली आहे.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. ‘कायकवे कैलास’ या तत्वज्ञानाचा अर्थ “काम हीच पूजा” असा असून प्रामाणिक परिश्रमातून यश मिळते,हा संदेश व्याख्यानातून देण्यात आले.

यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतीले यांनी मार्गदर्शन केले,तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मल्लिकार्जुन तरनळ्ळी उपस्थित होते. वक्त्यांनी बसवेश्वरांच्या विचारांची आजच्या औद्योगिक युगातील उपयुक्तता अधोरेखित करत प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य, स्वावलंबन आणि कार्यनिष्ठेचे महत्त्व पटवून दिले.



कार्यक्रमास प्राचार्य मनोज बिडकर,ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी,महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे माजी व्यवस्थापक विश्वनाथ आमणे,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर,अधिकारी,कर्मचारी आणि मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्षीय भाषण प्रा.मनोज बिडकर यांनी केले. सूत्रसंचालन कांचन कुंभार यांनी केले, तर स्मिता शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी निर्मला म्हेत्रे व सहाय्यक कार्यक्रमाधिकारी नितीन कु-हाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे प्रशिक्षणार्थ्यांना बसवेश्वरांच्या विचारांची प्रेरणा मिळाली असून त्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.