सोलापूर : भूतपूर्व हंगामी राष्ट्रपती तथा राज्यसभेचे माजी खासदार ब्रह्मदेव पासवान आणि समाजसेवक बी.एन.पटेल कुमार यांनी जाणता राजा बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलास सदिच्छा भेट दिली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थापक अध्यक्ष गणेश निळ यांनी केले.
या कार्यक्रमादरम्यान पुढील वर्षी सुरू होणाऱ्या “जिजाऊ गुरुकुल” या उपक्रमाच्या पत्रकाचे प्रकाशन ब्रह्मदेव पासवान यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच,जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलातील विद्यार्थी डॉ.लक्ष्मण केत याने एमबीबीएस ही वैद्यकीय पदवी प्राप्त केल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार ब्रह्मदेव पासवान यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना पासवान यांनी भारत देशाची प्रगती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलेली मान याबद्दल आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत मार्गदर्शन केले. भारतात प्रचंड शक्ती आणि क्षमता असून प्रत्येकाने आपल्या डोळे आणि कानांचा योग्य वापर केल्यास मोठी प्रगती साध्य होऊ शकते,असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात भाजप डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपळे यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच भटक्या विमुक्त जाती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बिभीषण जाधव यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी समाजसेवक बी.एन.पटेल कुमार,महिला विमुक्त जाती महासंघाच्या अध्यक्षा पुनम बिडकर,राजेश बिडकर, महेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब निळ यांनी केले,तर आभार प्रदर्शन प्रा. संजय जाधव यांनी मानले.
