Ticker

6/recent/ticker-posts

सोलापुरात अतिक्रमणांवर कडक कारवाईची मागणी; एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक ठिकाणी नोंदीचा आरोप



सोलापूर : शहरात वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून,एकाच व्यक्तीच्या नावावर तब्बल अनेक ठिकाणी अतिक्रमण नोंद असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की,महानगरपालिकेकडून अतिक्रमणधारकांना दंडात्मक पावत्या देण्याची पद्धत सध्या सुरू आहे. मात्र,या पावत्यांमुळे अतिक्रमण करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे संरक्षण मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दंड भरून पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण करण्याचा प्रकार वाढल्याने शहरातील रस्ते,पदपथ आणि सार्वजनिक जागा बाधित होत आहेत.



विशेषतः, एकाच व्यक्तीच्या नावावर मोठ्या प्रमाणात- अनेक ठिकाणी अतिक्रमण असल्याची माहिती समोर येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून संबंधितांच्या नावाने काढलेल्या पावत्या सार्वजनिक कराव्यात,अशीही मागणी पुढे आली आहे.

नागरिकांनी पालिकायुक्तांना आवाहन करताना सांगितले की, अतिक्रमण करणाऱ्यांवर फक्त दंड आकारण्याऐवजी थेट कारवाई करून अतिक्रमण हटविण्यावर भर द्यावा. तसेच, दंडात्मक पावत्या देण्याची पद्धत तात्पुरती बंद करावी, जेणेकरून अतिक्रमणाला आळा बसेल. याशिवाय,अशी प्रकरणे न्यायालयात गेल्यास संबंधितांना कोणताही दिलासा मिळू नये,यासाठी महानगरपालिकेने ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान,या गंभीर आरोपांवर महानगरपालिकेकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून,प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहते,याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.