Ticker

6/recent/ticker-posts

लोखंडी शस्त्राने वार करून खून प्रकरणात आरोपीस सशर्त जामीन


सोलापूर : लोखंडी हत्याराने डोक्यावर वार करून युवकाचा खून केल्याच्या गंभीर प्रकरणात अटक असलेल्या आरोपीस मुंबई उच्च न्यायालय,कोल्हापूर खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती सचिन एस.देशमुख यांनी ३० मार्च २०२६ रोजी हा आदेश दिला.

या प्रकरणात आरोपी अखिलेश समेश्वर बुनकर उर्फ कोरी (वय २४,रा. कोल्हारी,मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत खूनाचा गुन्हा सदर बाजार पोलीस स्टेशन येथे १५ ऑगस्ट २०२४ रोजी दाखल करण्यात आला होता.



घटनेचा तपशील - फिर्यादी व त्याचा मुलगा बबलू अधिवासी हे सोलापूरमध्ये पेंटिंगचे काम करून उपजीविका करत होते. १४ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता बबलू शेडसमोर उभा असताना आरोपीने त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. बबलूने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला.





वादाच्या भरात आरोपीने “आता मी याला सोडणार नाही” असे म्हणत लोखंडी हत्याराने बबलूच्या डोक्यावर जोरदार वार केला. गंभीर जखमी अवस्थेत बबलूला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले,मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.

तपास व न्यायालयीन प्रक्रिया - या प्रकरणात आरोपीस १८ ऑगस्ट २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. त्याचा जामीन अर्ज यापूर्वी जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर यांनी फेटाळला होता. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेत जामिनासाठी अर्ज दाखल केला.



बचाव पक्षाचा युक्तिवाद - आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात मांडले की,घटनेत पूर्वनियोजित हेतू नव्हता,वाद अचानक झाला एफआयआर नोंदविण्यात विलंब झाला आहे
तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाले आहे.
साक्षीदारांची संख्या मोठी असल्याने खटला लवकर पूर्ण होण्याची शक्यता कमी त्यामुळे आरोपीला पुढे कोठडीत ठेवणे अन्यायकारक ठरेल,असा युक्तिवाद करण्यात आला.





न्यायालयाचा निर्णय - दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीस काही अटी व शर्तींच्या अधीन राहून जामीन मंजूर केला.

वकिलांची बाजू -  या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. सौरभ तांदळे,ॲड.वैभव बोंगे,ॲडओंकार फडतरे, ॲड.शिवरत्न वाघ,ॲड.मोहीम पठाण,ॲड.मनिष बाबरे व ॲड.रोहित थोरात यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षातर्फे ॲड.नितीन पाटील यांनी बाजू मांडली.

ही घटना सोलापूरमध्ये खळबळ उडवणारी ठरली असून, गंभीर गुन्ह्यातील आरोपीस जामीन मिळाल्याने या निर्णयाकडे कायदेतज्ज्ञ व नागरिकांचे लक्ष लागले आहे.