Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूरात उद्याने ओसाड; बालकांसाठी खेळणी नसल्याने नागरिक संतप्त


सोलापूर : शहरातील अनेक सार्वजनिक उद्याने सध्या उदास अवस्थेत पडलेली असून लहान मुलांसाठी आवश्यक खेळण्यांची साधने उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महानगरपालिकेकडून योग्य देखभाल आणि दुरुस्ती होत नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

शहरातील काही प्रमुख उद्यानांमध्ये झोके,घसरगुंडी,सी-सॉ यांसारखी मूलभूत खेळणीच नसल्याने लहान मुलांना खेळण्यासाठी सुरक्षित जागा उरलेली नाही. परिणामी, मुलांना रस्त्यावर किंवा इतर असुरक्षित ठिकाणी खेळावे लागत आहे,ज्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे.


विशेषतः साधू वासवानी उद्यानासारख्या ठिकाणी परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे चित्र दिसून येत आहे. या उद्यानात देखभालीअभावी अस्वच्छता वाढली असून काही ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांचा अड्डा तयार झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे कुटुंबीय आणि महिलांना उद्यानात जाणे टाळावे लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. उद्यानांची स्वच्छता,सुरक्षितता आणि आवश्यक दुरुस्ती करून मुलांसाठी आधुनिक खेळणी बसवावीत,तसेच नियमित देखभाल केली जावी,अशी मागणी जोर धरत आहे.

याबाबत महानगरपालिकेने त्वरित उपाययोजना करून शहरातील उद्याने पुन्हा सजीव करावीत,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.