नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (भाजपा) संघटन अधिक बळकट करण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून देशभरात तब्बल 50 लाख प्रशिक्षित कार्यकर्ते तयार करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. यासोबतच कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी आणि संघटनात्मक कामकाजासाठी स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करणारा देशातील पहिला पक्ष बनण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा महत्त्वाकांक्षी आराखडा मंजूर करण्यात आला. या उपक्रमांतर्गत कार्यकर्त्यांना विचारधारा,संघटन कौशल्य,निवडणूक व्यवस्थापन,सोशल मीडिया वापर आणि जनसंपर्क यांसारख्या विविध विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देशातील प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोच साधण्याचा प्रयत्न केला जाणार असून,ऑनलाईन प्रशिक्षण,मार्गदर्शन सत्रे,व्हिडिओ लेक्चर्स आणि रिअल-टाइम संवादाची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील कार्यकर्त्यांनाही प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.
भाजपाच्या या उपक्रमामुळे संघटन अधिक सशक्त होण्याबरोबरच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची तयारीही अधिक भक्कम होईल,असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
