Ticker

6/recent/ticker-posts

महिलांसाठी “पिंक ई-रिक्षा योजना” : रोजगार,सुरक्षितता आणि स्वावलंबनाचा नवा अध्याय



सोलापूर : राज्य शासनाने महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. “पिंक ई-रिक्षा योजना” ही केवळ एक वाहतूक सुविधा नसून महिलांच्या रोजगार,सुरक्षितता आणि स्वावलंबनाचा नवा अध्याय ठरणार आहे.  

योजनेचा उद्देश - आजच्या काळात महिलांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात,त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवावे आणि प्रवासात सुरक्षिततेची हमी द्यावी,या तिहेरी उद्देशाने ही योजना राबविण्यात आली आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या मुलींना रोजगार मिळविण्याची संधी या योजनेतून उपलब्ध होईल.  



आर्थिक सहाय्याचे स्वरूप - ई-रिक्षा खरेदीसाठी महिलांना केवळ २० टक्के आर्थिक भार उचलावा लागणार असून उर्वरित ८० टक्के शासन अनुदान स्वरूपात देणार आहे. याशिवाय सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांकडून ५० टक्के कर्जाची सुविधा उपलब्ध होईल. ई-रिक्षा खरेदीमध्ये सर्व करांचा (GST,नोंदणी,रोड टॅक्स) समावेश असेल. लाभार्थी महिलांना १० टक्के आर्थिक भार उचलावा लागेल.  

प्रशिक्षण व सुविधा - योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना ई-रिक्षा चालविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर परवाना,गणवेश व ओळखपत्र देण्यात येईल. या माध्यमातून महिलांना केवळ रोजगारच नव्हे तर प्रवासात सुरक्षिततेची हमीही मिळेल.  


सामाजिक परिणाम - “पिंक ई-रिक्षा योजना” ही महिलांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडविणारी ठरेल.  
१) महिलांना स्वावलंबनाची संधी मिळेल.  
२) आर्थिक परिपूर्णतेकडे वाटचाल होईल.  
३) प्रवासात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.  
४) समाजात महिलांच्या सहभागाला नवे बळ मिळेल.  

दीर्घकालीन फायदे - या योजनेतून महिलांना पाच वर्षांच्या कालावधीत कर्जाची सुविधा मिळेल. ५० वर्षांपर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.  

राज्य शासनाची ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. रोजगार, सुरक्षितता आणि स्वावलंबन या तिन्ही बाबींचा समन्वय साधणारी ही योजना महिलांना नवा आत्मविश्वास देईल. “पिंक ई-रिक्षा योजना” ही केवळ एक सरकारी योजना नसून महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा मार्ग आहे.  

संपर्क :  महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर आणि जिल्हा महिला व बालविकास कार्यालय सोलापूर