Ticker

6/recent/ticker-posts

मोफत उपचारासाठी लाचेची मागणी; मंगळवेढ्यात डॉक्टर व आरोग्य मित्राविरुद्ध गुन्हा


मंगळवेढा : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार देणे बंधनकारक असताना शस्त्रक्रियेसाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील खाजगी डॉक्टर व ‘आरोग्य मित्र’विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,सोलापूर युनिटच्या माहितीनुसार, मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९४/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये डॉ. अरुणकुमार महिंद्रकर (वय अंदाजे ४५) व सोमनाथ इंगळे (वय अंदाजे ३८, आरोग्य मित्र) यांचा समावेश आहे.
तक्रारदाराच्या ७२ वर्षीय आईचा पाय घसरून पडल्याने त्यांना मंगळवेढ्यातील एका मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदाराची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचाराची मागणी केली.
मात्र, संबंधित डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी १६ हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी ६ हजार रुपये सुरुवातीला स्वीकारून शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यासाठी उर्वरित १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.


या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर २४ मार्च २०२६ रोजी ॲन्टी करप्शन ब्युरोने पडताळणी कारवाई केली. या कारवाईत आरोपींनी १० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ५ हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

यावरून दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दरम्यान,शासकीय योजनांच्या लाभासाठी नागरिकांकडून लाचेची मागणी होत असल्याचे गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.